रयत विद्यार्थी परिषदेकडून बोगस क्रिप्टो करन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल

0
424

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख यांचेकडून आरोपींची पाठराखण!

पुणे  दि. ८ (पीसीबी) : सीबीएक्स बुल टोकन या क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून माणिक राठोड आणि अशोक करडुले यांनी गुंतवणुकदाराची ५ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात रयत विद्यार्थी परिषदेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बोगस करंन्सीमध्ये १ हजारपेक्षा जास्त लोकांची फसवणूक झाली असून हा फ्राॅड अंदाजे ४० कोटींपेक्षा जास्त आहे. तरीही आपल्याला स्वच्छ भारत अभियान राबवायचे नाही तुमचे पैसे घ्या आणि विषय संपवा असे म्हणून हिंजवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख यांचेकडून आरोपींची पाठराखण केली जात असल्याने पीडितांना न्याय कसा मिळणार? असा प्रश्न रयत परिषदेचे सचिव राजू काळे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीबीएक्स बुल टोकन या क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्याला त्यांचे मित्र अशोक कैलास करडुले रा. सफेपूर, जि. बीड यांनी संपर्क साधून या क्रिप्टो करंन्सीबद्दल प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. या करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अशोक करडुले आणि माणिक शेषराव राठोड यांनी वारंवार भेटून या नवीन क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोकणे चौक परिसरात बोलावून प्रथम चर्चा केली व याबद्दल सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा सौदागर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये गुंतवणूक कशा संदर्भात होणार आहे यासाठी भेटलो आणि नेटवर्क मार्केटिंग मार्फत तुम्ही अजून माणसे जोडली तर कॅशबॅक नवीन करंन्सी सीबीएक्स बुल त्यामध्ये मिळतील. अशाप्रकारे येत्या काळामध्ये क्रिप्टो करंन्सी लिस्टेड करून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अशोक करडुले आणि माणिक राठोड यांनी सदरच्या गुंतवणूकदाराला गोवा येथे होत असलेल्या ॲलोर ग्रॅण्ड हॉलिडे रेस्टॉरंट गोवा येथील मोठ्या गुंतवणूक कार्यक्रमास बोलाविले व त्या हॉटेलमध्ये तीन दिवस दोन रात्र राहण्याची व खाण्याची, जाण्याची व येण्याची मोफत सोय केली होती. त्यानंतर पीडित गुंतवणूकदार नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम न करता गुंतवणूकदार म्हणून राहण्यास तयार झाले व माणिक राठोड आणि अशोक करडुले यांच्याकडे गुंतवणूकदार म्हणून ५ लाख ६२ हजार रुपयांची गुंतवणूक सीबीएक्स बुल या नवीन करंन्सीमध्ये केली.

परंतु करंन्सीमध्ये थेट गुंतवणूक झाली नाही. प्रथम आम्हाला क्रिप्टो करंन्सीमध्ये टीआरएक्स ट्रोन या क्रिप्टो करंन्सीमध्ये माणिक आणि करडुले यांनी ट्रोन करंन्सी विकत घ्यायला लावली आणि ती ट्रोन लिंक प्रो ब्लॉग चेनच्या वॉलवर लिंकद्वारे लॉगिन करून तिथून पुढे त्यांची वेबसाईट CBX Bull.Io या वेबसाईटवर रजिस्टर करून ट्रोन क्रिप्टो करंन्सी मार्फत रजिस्टर लाॅगिन आयडी मिळाली. त्यानंतर या करन्सीच्या पाॅलिसीमार्फत ५ लाख ६२ हजार रुपयाच्या रकमेवर दररोज १% रिटर्न कॉईन चालू दरानुसार कॉइंन्समध्ये पुढील २०० दिवस मिळतील असे सांगण्यात आले. त्यानंतर पीडित व्यक्तीने ५ लाख ६२ हजार रुपये त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आणि त्यांनी पाठवलेल्या लिंकद्वारे पूर्ण प्रक्रिया करून त्या कॉइनमध्ये गुंतवणूक केली. परंतु दोन महिन्यानंतर पीडितला आर्थिक अडचणींमुळे ते विकून मला पैसे हवे होते. त्यावेळी राठोड यांना फोनद्वारे संपर्क केला असता स्पाईन रोड चिंचवड येथील राखी हॉटेलला भेटलो. या भेटीच्या एक दिवस अगोदर अशोक करडुले यांना फोनद्वारे संपर्क केला असता तुमचे पैसे परत मिळणार नाहीत, हे सगळे फेक आहे असे समजल्यानंतर आम्ही राठोड यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सतत वेगवेगळी कारणे देत भेट नाकारली. त्यानंतर व्हाॅट्सअपद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्याचे उत्तर दिले गेले नाही. तेव्हा पीडितास आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रयत विद्यार्थी परिषदेचे सचिव राजू काळे यांचे मार्फत हिंजवडी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. त्यावरून माणिक राठोड आणि अशोक करडुले यांच्यावर ४०६, ४२०, ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बोगस करंन्सीमध्ये १ हजारपेक्षा जास्त लोकांची फसवणूक झाली असून हा फ्राॅड अंदाजे 40 कोटींपेक्षा जास्त आहे. क्रिप्टो करंन्सी गुंतवणूकदारांसाठी खरोखरच ही बाब धोकादायक आहे असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केले आहे. क्रिप्टो करंन्सीच्या मागे कसलाही आधार नाही.क्रिप्टो करंन्सीवर विश्वास ठेवणे कठीण आहे असे दास यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान रयत विद्यार्थी परिषदेने असे आवाहन केले आहे की, इतर नागरिकांनी या बोगस क्रिप्टो करंन्सीमध्ये गुंतवणूक करू नये आणि ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी रयत विद्यार्थी परिषदेकडे संपर्क साधावा, अन्यथा हिंजवडी पोलिस स्टेशनकडे संपर्क साधावा. या बोगस क्रिप्टो करंन्सीचा तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख करीत आहेत. परंतु तपास अधिकारी संदीप देशमुख हे आरोपींना मदत करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

त्याचे कारण की गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने आरोपीला पकडून तपास करायला हवा होता. मात्र तसे न करता आरोपींना फोनवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांना सांगतात आणि तक्रार देणाऱ्यालाच देशमुखांकडून सांगितले जाते की, तुझे पैसे घे आणि विषय मिटव. त्यावर रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष रविराज काळे म्हणाले की, यामध्ये १३०० पेक्षा जास्त लोकांचे पैसे अडकले आहेत त्यांचे काय? तेव्हा आपल्याला स्वच्छ भारत अभियान राबवायचे नाही, तुमचे पैसे घ्या आणि विषय संपवा असे वक्तव्य तपास अधिकारी एपीआय देशमुख करीत असतील तर न्याय कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित करून राजू काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.