रमाई स्मारकाच्या जागेवर पोलिस स्टेशन आऱक्षण सिमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, आशा शेंडगे यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या रांगा लावून हरकती

0
31

दि ८ ( पीसीबी )पिंपरी-चिंचवड शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि समस्त आंबेडकर अनुयायांसाठी श्रध्देचे केंद्रबिंदू ठरलेल्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील ‘भीमसृष्टी मैदान’ धोक्यात आहे. महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या सुधारित विकास आराखड्यात या मैदानावर पोलीस स्टेशन, मनपा उपयोग आणि बस टर्मिनसचे आरक्षण टाकले आहे. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे, रिपाई आठवले गटाच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, एमआयएम च्या रुईनाझ शेख, राजन नायर, प्रा.नामदेव जाधव, धर्मपाल तंतरपाळे, रिपाईचे बापू गायकवाड, रंजना गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे संतोष जोगदंड, विनोद गायकवाड, अजिज शेख , माता रमाई स्मारकाचे विनोद गायकवाड, निलध्वज माने, अनिता सावळे, नंदू भुजंग, सर्वजित बनसोड, विशाल कांबळे, सिकंदर सुर्यवंशी, संजोष जोगदंड, अॅड. कांबळे, बी.बी. शिंदेआदींसह दोनशेवर नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग मोठा होता.
डॉ. आंबेडकर स्मारकापासून सर्वजण रांगेत महापालिका भवनात आले. तिथे घोषणांनी परिसर दणानून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जयकारासह, रमाई स्मारकाची जागा आरक्षण झालेच पाहिजे, पोलिस स्टेशनचे आरक्षण उठलेच पाहिजे आदी घोषणा झाल्या. नगररचना उपसंचालक यांच्याकडे सर्वांनी मिळून एक एक करत हरकती सादर केल्या. पोलिस स्टेशनचे आरक्षण वगळून तिथे रमाई स्मारकाचेच आरक्षण टाका, अशी सुचना सर्वांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव म्हणजे केवळ एक सोहळा नाही, तर तो विचार, प्रेरणा आणि एकजुटीचा महामेळावा आहे. संपूर्ण शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुका याच भीमसृष्टी मैदानावर एकत्र येतात, जिथे ज्ञानाचा प्रकाश देणारी प्रबोधनात्मक व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आठवडाभर परिसर भारलेला असतो. हजारो नागरिक, बालकांपासून वृद्धांपर्यंत, मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात. इतर वेळा वर्षभरात याच मैदानावर अनेक सामाजिक, राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात, जिथे अनेक दिग्गजांनी आपले विचार मांडले आहेत. हे मैदान म्हणजे आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे. “डॉ. आंबेडकर अनुयायांना या महामानवाला अभिवादन करण्यासाठी शहरात एकच जागा उपलब्ध होती. सुधारित विकास आराखड्याच्या माध्यमातून ती देखील हिसकावण्याचा हा षडयंत्रपूर्वक डाव आखण्यात आला आहे. विशेषतः या ऐतिहासिक जागेवर मुद्दाम पोलीस स्टेशनचे आरक्षण लादून सर्व आंबेडकरी जनतेचा घोर अपमान करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी जागाच मिळू नये, असा हा नीच कट आहे.