नवी दिल्ली, दि. २५ : देशभरात एकीकडे रमजान ईदचा उत्साह असून दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी नववर्ष म्हणजे गुढी पाडव्याच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे. गुढी पाडवा आणि रमजान ईद हे दोन्ही उत्सव एकापाठोपाठ एक आल्याने हिंदू व मुस्लिम बांधव सणाच्या तयारीला लागले आहेत. सामाजिक सौहार्द व बंधुप्रेम जपत दोन्ही सण साजरे होत आहेत. त्यातच, भाजपने (BJP) 32 लाख मुस्लिम बांधवांना ईदनिमित्ताने ईदी भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सौगात ए मोदी’ नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून 32 लाख मुस्लिम बांधवांना हे कीट देण्यात येणार आहेत. या कीटसंदर्भात बोलताना भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीनिमित्ताने हिंदू बांधवांना तर बडे दिननिमित्त ईसाई बांधवांना भेटवस्तू देतात. त्यामुळे, आता ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना ही भेट दिली जात असून मोदींवर सर्वच मुस्लिम बांधव प्रेम करतात, असेही गौतम यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे. देशभरातली 32 लाख गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी कीट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे. भाजपच्या अल्पसंख्याने विभागाने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी, मोर्चाचे प्रभारी आणि भाजप महासचिव दुष्यंत गौतम यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदींना कुठलाही एक धर्म जास्त जवळचा नसून ते सर्वच धर्मावर प्रेम करतात. त्यामुळेच, मोदींवर सर्वच मुस्लिम प्रेम करतात. देशातील पंतप्रधान आपलाच आहे, आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यामुळेच, देशभरातली 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबात सौगात ए मोदी किट भेट स्वरुपात देण्यात येणार आहे, असेही दुष्यंत गौतम यांनी म्हटलं.
32 हजार कार्यकर्ता करणार काम
भाजपने देशभरातली 32 हजार कार्यकर्त्यांन या सौगात ए मोदीची जबाबदारी दिली आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता एका मस्जिदची जबाबदारी घेणार आहे. त्यानुसार, देशभरातली 32 हजार मस्जिदींजवळ गरीब मुस्लिम बांधवांना सौगात ए मोदी कीटचे वाटप केले जाईल. यासह जिल्हा स्तरावर भाजपच्यावतीने ईद मिलन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलं आहे.
सौगात ए मोदी कीटमध्ये काय?
भाजपकडून देण्यात येणाऱ्या सौगात ए मोदी कीटमध्ये नेमकं काय असणार आहे. तर, या कीटमध्ये नवीन कपडे, शेवया, खजूर, काजू-बदाम आणि साखर असणार आहे. तर, महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल.












































