रत्नागिरीतही प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकेवर अत्याचार

0
26

रत्नागिरी, दि. २७ (पीसीबी) : बदलापूर घटना ताजी असताना आता रत्नागिरीतही एका प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकेवर अत्याचार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याविरोधात सर्वसाधारण रुग्णालयाच्या महिला कर्मचार्‍यांनी परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन छेडले आहे. तर याविरोधात शिवसेना, भाजपा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य रत्नागिरीकरही रस्त्यावर उतरले.

परिचारिकेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या घटनेनंतर आता सर्व स्तरातील लोक, राजकीय पक्ष जिल्हा रुग्णालय येथे पोहोचले असून जमावाने आपला संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरीच्या इतिहासात अशा प्रकारची घटना धक्कादायक असून दिवसाढवळ्या रत्नागिरीत असे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे.


रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून प्रशिक्षण घेणार्‍या एका तरुणीला चंपक मैदान, उद्यमनगर रत्नागिरी येथे बेशुद्ध स्थितीत काही नागरिकांनी पाहिले. त्याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलीस यंत्रणेने या तरुणीला रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे उपलब्ध असणार्‍या कागदपत्रांवरुन संगमेश्‍वर तालुक्यातील देवरुख परिसरातील एका गावातील ती असल्याचे उघड झाले. तिच्यावर उपचार सुरु झाल्यानंतर तिने दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. सोमवारी सकाळी तिच्या वडिलांनी तिला देवरुख येथे एसटी बसमध्ये बसविले. त्यानंतर ती साळवीस्टॉप रत्नागिरी येथे उतरली. त्यानंतर एका रिक्षामध्ये ती बसली आणि रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले. ते पाणी कडू होते, असे तिने पोलिसांना जबाब देताना म्हटले आहे. रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, या तरुणीवर अत्याचार झाला असल्याची शक्यता दाट असून भा.दं.वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.