रतन टाटांमुळे पिंपरी चिंचवडचे सोनं झालं

0
76

दि. 10 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीत खऱ्या अर्थाने टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे सर्वात मोठे योगदान आहे. गेल्या पाच पन्नास वर्षांतील शहराच्या वाटचालीत टाटा मोटर्सचा सिंहाचा वाटा आहे. केवळ या कंपनीमुळे शहरात वाहनांचे सुटे भाग बनविणारे हजारो उद्योग आले. प्रत्यक्ष अप्रत्यक्षात या शहरातील किमान दोन-अडिच लाख हातांना काम मिळाले. हजारो कुटुंबांचे संसार उभे राहिले. शेतकऱ्यांची पोर लघुउद्योजक बनली. शहराचे अर्थकारण, समाजकारण बदलले. एका टाटा कंपनीमुळे पाच-सहा हजार कर्तेसवर्ते लघुउद्योजक झाले. पूर्वी फक्त जड वाहने म्हणजे छोटे मोठे ट्रक बनविणाऱ्या या कंपनीत इंडिका, इंडिगो प्रवासी कार तयार झाली. रतन टाटांच्या स्वप्नातील नॅनो आली आणि हे शहर वाहन उद्योगाचे केंद्र झाले. वर्षातून किमान तीन-चार वेळा रतन टाटा इथे मुक्कामाला येत. टाटा लेक हाऊसवर हे त्यांचे आवडते ठिकाण. नॅनोच्या अनावरण प्रसंगी किंवा अन्य भेटीत कामगारांप्रती त्यांना दाखविलेला जिव्हाळा आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. इतकेच नाही तर कामगार प्रतिनिधींशी संवाद, त्यांच्या बरोबर भोजन, फोटोसेशन हे आगळे वेगळे व्यक्तीमत्व भावते. हजारो कोटींचे मालक मात्र, कुठलाही बडेजाव नाही. अत्यंत साधी राहणी, स्वच्छ कारभार, सरळ वर्तन हेच टाटांचे कल्चर या शहराच्या अंगवळणी पडले. आजही टाटा कंपनीत नोकरीला म्हटले की राहणाऱ्या सोसायटीत, बँकेत एक वट असतो. हे सगळे निर्माण कऱणारे लाखोंचे पोशिंदे रतन टाटा गेल्याने शहर पोरके झाले.
टाटा मोटर्स कर्माचाऱ्यांच्या १९८९ च्या संपातील कटू आठवणी आजही स्मरतात. कुठलाही संयम ढळू न देता अत्यंत कौशल्याने हा संप हाताळला. नंतर पुन्हा असा प्रसंग कधी आलाच नाही, कारण मालक-कामगार हे नातेच संपुष्ठात आले होते. सुरेंद्र चव्हाण किंवा शितल महाजन यांनी हिमालय सर केला कारण रतन टाटांची मदत. दानशूरपणाचे असे शेकडो नव्हे हजारो दाखले देता येतील. मुळात अशी माणसेच दुर्मिळ आहेत. पिंपरी चिंचवडकरांनी खरे तर रतन टाटांचे ऋण म्हणून मोठे स्मारक उभे केले पाहिजे. केंद्र-राज्य सरकारवर विसंबून न राहता भविष्यातील उद्योजक घडविण्यासाठी देशात हजारो रतन टाटा निर्माण करण्यासाठी एक संकुल निर्माण करायला हरकत नाही. या नगरीच्या उभारणीत यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे, शरद पवार, अजित पवार या राज्यकर्त्यांचे जितके योगदान आहे तितकेच किंवा काकणभर अधिकचे उपकार रतन टाटांचे आहेत. चाकण, तळेगाव पट्ट्यात उभ्या राहणाऱ्या उद्योगनगरीलासुध्दा रतन टाटा यांचे नाव द्यायला पाहिजे. या जग्गजेत्या महान राष्ट्रपुरुषाला ती खरी आदरांजली असेल.