योगेश बहल, विलास लांडे निष्ठावंत नाहीत का ? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
30

दि . ११ ( पीसीबी ) – तळ्यात मळ्यात करू नका, निष्ठा ठेवा. निष्ठेचे फळ पहा अण्णा बनसोडे कुठपर्यंत पोहचले, असं उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी बोलून गेले. विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार बनसोडे यांच्या नागरी सत्काराचे निमित्त होते. मुळात निष्ठा हा शब्दच गुळगुळीत झालाय. पूर्वी त्याला पत होती प्रतिष्ठा होती. बाजारू दलबदलू राजकारणात त्या निष्ठेची पार विष्ठा झाली. किमान पवार कंपनीने तरी निष्ठेवर बोलून स्वतःचेच हसू करून घेऊ नये. अगदी शरद पवार काय किंवा अजित पवार काय दोघांनाही ते लागू आहे.
आमदार बनसोडे यांनी निष्ठा ठेवली म्हणून त्यांना पद दिले असे म्हणताना अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या दोन नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. ते नेते म्हणजे माजी महापौर विलास लांडे आणि दुसरे पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल. कारण आयुष्यभर घरदार सोडून बारामतीकरांच्या घरात पाणी भरले. बस म्हटल्यावर बसले आणि उठ म्हटल्यावर उठले. भाजपच्या सत्ता काळात अनेकदा आमदारकीची ऑफर असूनही निष्ठा कायम ठेवली. दादांनी साहेबांची राष्ट्रवादी सोडली आणि स्वतंत्र चूल मांडली तेव्हा पटले नाही. तिथेही दादांच्याच मागे राहिले. निष्ठेची विष्ठा झाली.
खरे तर, शहराला कोणी काय दिले याची आता थोडी तुलना केलीच पाहिजे. २०-२५ वर्षांत अजित पवार यांनी त्यांच्या पिंपरी चिंचवडमधील निष्ठावंतांना काय काय दिले आणि अवघ्या सात-आठ वर्षांत भाजपने काय दिले हेसुध्दा तिकचे महत्वाचे आहे. भाजपने या मागासवर्गातील चेहरा म्हणून अमर साबळे यांच्यासारख्या अत्यंत सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभा खासदार केले. राष्ट्रवादीतून आलेले दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना आमदार केले आणि सर्वाधिकार दिले. मातंग समाजाचा चेहरा म्हणून अमित गोरखे यांनी अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष केले, परिषदेवर आमदार केले. गोपीनाथ मुंडे यांचे उजवे हाथ असलेल्या सदाशिव खाडे यांना प्राधिकरण अध्यक्ष केले. पक्षासाठी आयुष्य वेचलेल्या आणि ओबीसींचा चेहरा असलेल्या सुवर्णकार समाजातील उमा खापरे यांनी परिषदेवर संधी दिली. अनुप मोरे यांना माथाडी मंडळ सदस्य केले. निष्ठावंतांची भाजपने किती कदर केली ते डोळे उघडून पाहा. महापालिकेत पदे वाटप करतानाही भाजपने

सात टर्म नगरसेवक आणि सर्वात जेष्ठ असूनही योगेश बहल यांना आमदारकी मिळाली नाही. आमदार बनसोडे नंतर आले पण १९९२ पासून बहल दादांचेच राहिलेत. उच्च शिक्षित आहेत, मोठा जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांचे जाळे आहे. फर्डे वक्ते, उत्तम समन्वयक, मॅनेजर आहेत. अगदी साम, दाम, दंड जे दादांच्या लेखी पात्रतेचे निकश असतात ते सगळे पुरेपूर आहे. फक्त ते अमराठी म्हणजे पंजाबी आहेत. बहल हे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विधी समिती अध्यक्ष, सत्ताधारीनेता, पक्षाचे शहराध्यक्ष झाले मात्र, पात्रता असूनही ते आमदार होऊ शकले नाहीत. पिंपरी विधानसभा राखीव होती म्हणून त्यांना संधी मिळाली नाही. मावळ लोकसभेला बळीचा बकरा पाहिजे होता म्हणून बहल यांना उमेदवारीची ऑफर होती हे सर्वश्रृत आहे. त्याच जागेवर राहुल नार्वेकर लढले, पडले आणि परिषदेवर गेले. तिथेच जर का बहल असते तर ते अमराठी ही अपात्रता ठरली असती. पुणे शहरात कानडी असूनही सुरेश कलमाडी खासदार, मंत्री होतात. पिंपरी चिंचवडमध्ये आझमभाई काय किंवा बहल, शेट्टी, मुलचंदानी, आसवाणी किमान राष्ट्रवादीतून आमदार का झाले नाहीत याचे उत्तर दादांनी दिले पाहिजे. उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यात अर्थ नाही.
विलास लांडे यांच्या देव्हाऱ्यात शरद पवार यांचा फोटो आहे, असे ते सांगतात. दोन वेळा आमदार झाले. शिरूर लोकसभेला ते पडले आणि आमदारकीलाही पराभूत झाले. शरद पवार यांच्याच तालमित तयार झालेला पठ्ठा असल्याने वारे येईल त्या दिशेला तोंड फिरवत राहिले. खरे तर, शहरात इतका कसलेला मुरब्बी राजकारणी दादांच्या बरोबर होता. भोसरीच्या राजकारणाला वळण द्यायचे, भाजपला शहरात शह द्यायचा तर विलासशेठ हे ताकदिचे नाव राष्ट्रवादीत होते. दादांना तेच वापरता आले नाही म्हणून ते तळ्यात मळ्यात करत राहिले. लक्ष्मण जगताप यांच्या बरोबर भाजपची ऑफर असताना शेठ तिकडे फिरकले नाहीत कारण निष्ठा पवारांशी होती. पडत्या फळाची आशा म्हणून पुढे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळेल म्हणून विलासशेठ थांबले. त्याच्याही वाटेला निराशा आली. मुळात आमदार बनसोडे यांची बहल किंवा लांडे यांची तशी बरोबरी होत नाही. दादांना अतिहुशार नेता नको असतो. बहल आणि लांडे यांनी डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या म्हणून ते नकोशे झाले. निष्ठा वगैरे सब झूट. जे अजित पवार एका रात्रीत आमदारांची यादी घेऊन फडणवीस यांना भेटून पहाटे शपथ घेताता, जे राष्ट्रवादी फोडून भाजप बरोबर पाट लावतात त्यांनी तळ्यात मळ्यातची भाषा करावी हेच हास्यास्पद आहे.