योगसाधना म्हणजे वैश्विक शक्तीशी जोडण्याची प्रक्रिया!”

0
401

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – ‘युज’ या संस्कृत शब्दापासून तयार झालेला योग हा आत्म्याला परमात्म्याशी जोडतो; त्यामुळे व्यक्तीला वैश्विक शक्तीशी जोडण्याची प्रक्रिया म्हणजे योगसाधना होय!” असे विचार ज्येष्ठ योगतज्ज्ञ स्नेहल भिंगारकर यांनी संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक २८, आकुर्डी प्राधिकरण येथे मंगळवार, दिनांक २१ जून २०२२ रोजी व्यक्त केले.

अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि चैतन्य हास्ययोग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित केलेल्या योगशिबिरात स्नेहल भिंगारकर यांनी मार्गदर्शन केले. माजी उपमहापौर शैलजा मोरे, पिंपरी-चिंचवड अल्पसंख्याक मोर्चाचे माजी अध्यक्ष सलीम शिकलगार, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, ज्ञानेश्वर खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शैलजा मोरे यांनी आपल्या मनोगतातून, “भगवंताने दिलेल्या अमूल्य देहाच्या निरामय आरोग्यासाठी नियमितपणे योग आणि झेपेल इतपत व्यायाम करणे गरजेचे आहे!” असे मत व्यक्त केले

. याप्रसंगी स्नेहल भिंगारकर यांनी ओंकारसाधना, शंखनाद, मंत्रशक्ती, श्वासनियंत्रण, प्राणायाम, ॲक्युप्रेशर याविषयी सखोल माहिती देताना सुखासनातील अन् विशेषतः ज्येष्ठांना सुसह्य होतील अशा योगासनांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करवून घेतली. सुमारे पंचाहत्तर नागरिकांनी सहभाग घेऊन त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती. योग प्रात्यक्षिकांनंतर ज्योती कानेटकर आणि त्यांच्या आठ महिला सहकाऱ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून वैयक्तिक अन् सार्वजनिक स्वच्छता तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयी प्रभावीपणे प्रबोधन केले. चैतन्य हास्ययोग परिवार, सुसंगती आणि एकता ज्येष्ठ नागरिक संघांच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. जगन्नाथ वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. सलीम शिकलगार यांनी आभार मानले.