योगगुरूच बनला मास्टरमाईंड! अहमदाबाद मध्ये AIच्या मदतीने बनवल्या २ कोटींच्या बनावट नोटा!

0
2

दि.२४(पीसीबी) गुजरातमधून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर आली आहे. अहमदाबाद क्राईम ब्रांचने तब्बल 2 कोटींहून अधिक बनावट नोटा जप्त करत मोठा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात एक तथाकथित योगगुरू आणि त्याच्या अनुयायांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप जोटंगिया उर्फ प्रदीपजी हा सूरतमधील Shree Satyam Yog Foundation या आश्रमाचा प्रमुख असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अमराईवाडी परिसरात एका कारची तपासणी केली असता त्यातून तब्बल 2 कोटी 38 लाख रुपयांच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

तपासादरम्यान आरोपींनी या नोटा सूरतमधील आश्रमातून आणल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सूरतमध्ये छापे टाकत आणखी 28 लाख रुपयांच्या बनावट नोटा, तसेच प्रिंटिंग मशीन, कलर इंक, विशेष कागद आणि इतर साहित्य जप्त केलं आहे.या संपूर्ण रॅकेटमध्ये प्रदीप जोटंगिया हा मुख्य सूत्रधार असून, इतर आरोपी स्वतःला त्याचे अनुयायी असल्याचं सांगत होते. या टोळीमध्ये मुकेश ठुम्मर, रमेशभाई, भरत काकडिया, अशोक मवाणी, रमेश बालर, दिव्येश राणा आणि एका महिलेचा समावेश आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे—बनावट नोटा तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी इंटरनेटवरून माहिती घेऊन प्रिंटर, कार्ट्रिज, पेपर कटर आणि विशेष प्रिंटिंग पेपर खरेदी केला. एवढंच नाही, तर नोटांच्या डिझाइन आणि लुक अधिक वास्तवदर्शी करण्यासाठी AI तंत्रज्ञान आणि फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला.

प्रिंटिंगसाठी लागणारा सिक्युरिटी थ्रेड असलेला विशेष कागदही आरोपींनी परदेशातून विशेषतः चीनमधून मागवला असल्याची माहिती समोर आली आहे. तयार झालेल्या या बनावट नोटा बाजारात विकण्यासाठी आरोपी अहमदाबादमध्ये आले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं.

या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात बनावट चलन बाजारात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, या प्रकरणामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, याचं गंभीर चित्र समोर आलं आहे.सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.