येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये तुफान राडा

0
286

पुणे, दि. २० (पीसीबी) : पुणे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण झाली. या हाणामारी प्रकरणात गालफोडे टोळीचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

येरवडा कारागृहात 16 कैदी आपापसात भिडले. या कैद्यांनी पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केली. या हाणामारीत काही कैदी जखमी झाले आहे. पुणे येथील गालफाडे टोळीतील कैदी जेलमध्ये आक्रमक झाले अन् त्यांनी हाणामारीस सुरवात केली. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात मारहाणीची घटना

येरवडा कारागृहात एप्रिल महिन्यात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणातील कैदी आक्रमक झाले होते. या आरोपींना किशोर विभागात ठेवण्यात आले होते. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी दोघांना बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले होते. कारागृहात वाढत जाणाऱ्या हाणामारीच्या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे.