येऊ घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडीच जिकणार; काँग्रेसच्या प्रदेश प्रभारींचा विश्वास

0
124

गडचिरोली, दि. २० (पीसीबी) – देशात भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने सांप्रदायिकता, धार्मिक धृवीकरणाचे राजकारण खेळले जात आहे. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठीही राममंदिराचा आश्रय घ्यावा लागत आहे. काॅंग्रेस मात्र सामाजिक सद् भाव निर्माण करण्यासाठी पुर्वीही झटत होता आणि आजही झटत आहे. त्यामुळे आमची लढाई भाजपच्या सांप्रदायिकता, धार्मिक धृवीकरणाच्या राजकारणाविरोधात आहे. ही लढाई आणि आगामी निवडणुकाही महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची विभागीय बैठक शनिवार (ता. २०) गडचिरोली येथील महाराजा लाॅन येथे आयोजित करण्यात आली असून यानिमित्त गडचिरोली दाखल झालेले चेन्नीथला यांनी पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

या पत्रकार परीषदेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, केंद्रीय नेते आशीष दुवा, माजी मंत्री अनिस अहमद, शिवाजीराव मोघे, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार सुभाष पोटे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, माजी आमदार आनंदराव गेडान, डॉ. नामदेव उसेंडी, रवींद्र दरेकर, डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, अॅड. गोविंद भेंडारकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, देशातील वाढती सांप्रदायिकता, धर्मांधता, अन्यायाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा प्रारंभ केली आहे.

आपण सर्वांनी त्यांच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे. भाजप सक्षम नसल्यानेच ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकते, इतर पक्षांतील आमदार, खासदार फोडून सत्ता मिळवण्यासाठी अनेक खटपटी करते. त्याने देशाच्या विकासापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका महत्त्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत. आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक बैठक झाली आहे. दुसरी बैठक लवकरच पार पडेल, त्यानंतर जागा वाटप जाहीर करू, असेही ते म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरद पवार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे चर्चा करत असून त्यांची चर्चा आटोपल्यावर आम्हीही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सांप्रदायिकता, धार्मिक धृवीकरण, महागाई, बेरोजगारी अशा मुद्यांवर आम्ही पूर्ण ताकदीने लढू व जिंकू, असेही ते म्हणाले. तसेच यावेळेस काॅंग्रेचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर करणार असल्याचेही म्हणाले.

फक्त ६ देशांमध्ये ईव्हीएमचा वापर…
जगात फक्त ६ देशांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो, अन्य देश मतपत्रिकेचा वापर करतात, अशी माहिती देताना भारतातही मतदान पत्रिकेचा वापर व्हावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परीषदेत केली.