अमरावती, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी तीन महिन्यांपूर्वी केला होता. आता, राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. राणा दाम्पत्याने मात्र हे आरोप फेटाळून लावले. दुसरीकडे, हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक अफरातफरीशी निगडित असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार का, असा सवाल राऊत यांनी केला होता. राऊत यांनी नवनीत राणा यांच्या निवडणूक शपथपत्रातील कागदपत्रांच्या आधारे हे आरोप केले. लकडावाला याचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध होते. अनेक गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांशी त्याचा संबंध होता. तुरुंगात असतानाच तो मरण पावला. राणा यांनी लकडावालाकडून ही रक्कम कर्जरूपाने का व कशासाठी घेतली, त्याच्याशी काय संबंध होते, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले होते.
खासदार नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रातील जंगम मालमत्तांच्या तपशीलात गुंतवणुकीविषयीच्या रकान्यात क्रमांक ३ वर युसूफ लकडावाला – ८० लाख रुपये असा उल्लेख आहे. याआधारे संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर आरोप केले.