युवा पिढीचा मतदान टक्का वाढविण्यासाठी वाकडच्या गोल्ड जिममध्ये जनजागृती

0
43

वाकड, दि. 25 (पीसीबी) : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी शपथ वाकड येथील गोल्ड जिममधील सदस्यांनी घेतली.

युवा पिढीचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत वाकड येथील गोल्ड जिम मध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या मतदान जनजागृती कार्यक्रमावेळी चिंचवड विधानसभा स्वीपचे नोडल अधिकारी राजीव घुले, गोल्ड जिमचे व्यवस्थापक योगेश हर्लेगले, प्रशिक्षक स्वप्नील शेळके, शेषाद्री रुदमल, आणि स्वीप टीमचे तसेच गोल्ड जिमचे सदस्य उपस्थित होते.

सशक्त व सक्षम लोकशाहीचा हा उत्सव असून शंभर टक्के प्रत्यक्ष मतदान करून तो सर्वांनी साजरा करायला हवा, असा संदेश देत तरुणांना यावेळी मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच आपल्याला असलेला मतदानाचा हक्क व तो बजावण्याचे कर्तव्य याविषयी मार्गदर्शन करून मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.