युवक राष्ट्रवादी पदाधिकारी अजितदादांच्याच बरोबर

0
84

दि ६ जुलै (पीसीबी ) – पिंपरी-चिंचवडची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभा अध्यक्ष यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर संपूर्ण युवक पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या सोबत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, शहरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांची भेट घेत आम्ही अजितदादांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई येथे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शेखर काटे, कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे यांनी पार्थ पवार यांची भेट घेतली. तसेच आमच्या बरोबरीनेच शहरातील अन्य सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अजितदादांसोबतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी वरील पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना दिला.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाचे अधिक खासदार निवडून आले. तसेच एकूणच महाविकास आघाडीचे अधिक खासदार निवडून आल्यानंतर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या अनेकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात जाऊन उमेदवारी मिळवण्याकरिता हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर विधानसभेनंतर येत्या काही दिवसात होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पदाधिकारी आत्तापासूनच पक्षांतराच्या उड्या मारू लागले आहेत. अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे अजित पवार गटातील किमान १६ ते २० माजी नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असा दावा शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. तेव्हा माजी नगरसेवकांपाठोपाठ युवकचे पदाधिकारी पक्ष सोडतील असे बोलले जात होते. मात्र प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी किंवा शहरातील माजी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले तरी शहरातील सध्याचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अजितदादांबरोबरच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन पार्थ पवार यांना सांगितले आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक पदाधिकाऱ्यांची पक्षांतर करण्याची मानसिकता आता तयार झाली असून यामुळे शहरातील एकंदरीत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे