युगेंद्र पवार यांंना अजितदादा समर्थकांचा घेराव

0
187

बारामती -: लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने महायुती व महाआघाडीकडून तयारी केली जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आहे.

बारामती मतदारसंघातील एका गावात मतदारभेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे गेले होते. युगेंद्र हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. बारामती तालुक्यातील सोनेश्वर परिसरात त्यांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याचा प्रकार पुढे आला आहे.

बारामतीतील सोनेश्वर परिसरात युगेंद्र पवार 20 मार्चला दौऱ्यावर होते. या वेळी त्यांना अजित पवार यांच्या समर्थकांनी घेराव घातला. गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचं बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. या टीकेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

यावरच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे युगेंद्र पवारदेखील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेचा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर तो जाणूनबुजून व्हायरल करण्यात आला असल्याचेही या वेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना सांगितले.

या वेळी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचे हे म्हणणे ऐकून घेत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुका असतील तर त्या दुरुस्त करू, असे आश्वासन या वेळी कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर युगेंद्र पवार तेथून निघून गेले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बारामती मतदारसंघातील हा प्रकार समोर आला आहे.