युक्रेनचा रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला

0
3

दि.21 (पीसीबी) – रशिया आणि युक्रेनमध्ये भीषण लढाई सुरु आहे. युक्रेनने रशियावर एक मोठा हल्ला केला आहे. युक्रेनकडून रशियन शहरावर सतत बॉम्ब हल्ले सुरु आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर युक्रेनने रशियावर मोठे हल्ले सुरु केले आहेत. यात घातक मिसाइल्सचा वापर होतोय. शनिवारी युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केला. युक्रेनी सैन्याने कजानमधील 6 इमारतींवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर कजानमध्ये एकच गडबड गोंधळ सुरु झाला. हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हल्ल्यानंतर बचाव कार्य सुरु असताना आणखी एक हल्ला झाला. कजान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, युक्रेनी सैन्याने 8 ड्रोन्सनी 6 इमारतींना लक्ष्य केलं आहे. सतत सुरु असलेल्या या हल्ल्यांमुळे रशियन नागरिकांना अंडरग्राउंड शेल्टर्समध्ये आसरा घ्यावा लागला आहे. कजान शहरच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी रहाण्यास सांगितलं आहे.

कुठे-कुठे हल्ला झाला?
प्राथमिक माहितीनुसार, कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवलं आहे. या हल्ल्यात कोणाचा मृत्यू किंवा कोणी जखमी झाल्याच वृत्त नाहीय. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हल्ला झालेल्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

रशियाने काय घोषणा केली?
या हल्ल्यानंतर रशियातील तातारस्तान रीजनच्या सरकारने पुढच्या दोन दिवसांसाठी राज्यातील सर्व सामूहिक कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारने हे पाऊल सुरक्षेच्या कारणास्तव उचललं आहे. या निर्णयावरुन असं दिसतय की, रशिया युक्रेनच्या हल्ला करण्याच्या क्षमतेला एक सामान्य घटना मानायला तयार नाही. पुढेही असे हल्ले होऊ शकतात ही भिती आहे. रशियाने पहिल्यापासून सांगितलय की, प्रत्येक हल्ल्याला आम्ही सडेतोड उत्तर देऊ. आता रशियाची प्रतिक्रिया काय असेल? याकडे सगळ्यांच लक्ष आहे.