-खासदारांची घणाघाती टीका; कार्यकर्त्यांना भीमाचा अवतार घेण्याचे आवाहन
भोसरी, दि. 07 (पीसीबी) : पुराणातील बकासुराचा अंत झाला असला तरी बकासुराच्या प्रवृत्तीचा अजूनही अंत झालेला नाही. त्या बकासुराला गाडाभर अन्न लागत होते मात्र ‘या’ बकासुराला भंगार ,कचरा, कंत्राट, सातबारा अगदी संतपीठ , इंद्रायणी सुधार प्रकल्प सुद्धा कमी पडत आहे अशी घनाघाती टीका शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. या बकासुराला नष्ट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला आता भीमाचा अवतार घ्यावा लागेल असेही डॉ.अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ निगडी यमुना नगर येथील सीझन बँक्वेट हॉलमध्ये बुधवारी (दि. 6 )कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये डॉ अमोल कोल्हे बोलत होते. मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेविका भिमाबाई फुगे तसेच केसरीनाथ पाटील, मनीषा गरुड, इमरान शेख आदीं उपस्थित होते.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले , भोसरी विधानसभा मतदारसंघात अजित गव्हाणे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. 40 आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे पाठबळ त्यांच्या मागे आहे. या प्रत्येकाने किमान पाच हजार मतांची जबाबदारी जरी घेतली तरी एक हाती विजय निश्चित आहे. या विजयातून आपल्याला भोसरी मतदारसंघातील बकासुराचा अंत करायचा आहे. पुराणातील बकासुराचा अंत झाला मात्र सद्यस्थितीतील बकासुर प्रवृत्तीचा अंत झालेला नाही. आमच्या या मतदारसंघातील बकासुराला, भंगार, कचरा, कंत्राट अगदी सातबारा सुद्धा पाहिजे असतो. संतपीठ, हॉस्पिटल, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प , एसटीपी अशा प्रत्येक ठिकाणी आमचा बकासुर बोकाळला आहे. याला थोपवण्यासाठी आता प्रत्येक कार्यकर्त्याला भीमाचा अवतार घ्यावा लागेल
आपण पालिकेचा मलिदा खाऊ..!
राज्यात अनेक योजनांचा पूर आला आहे . आमच्या पिंपरी चिंचवड पालिकेत तर “आपण आमदार होऊ आणि पालिकेचा मलिदा खाऊ” ही योजना अनेक दिवसांपासून लागू आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायचे आहे खासदार डॉ अमोल कोल्हे म्हणाले.