या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं – आमदार शहाजीबापू पाटील

0
201

सिंधुदुर्ग , दि. १६ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना फार कमी वेळा भेटत होते, काही ‘बडव्या’मुळे आमदार अन् ठाकरे यांच्यात दरी पडली होती, अशी टीका ठाकरेंवर शिंदे गटातील आमदार करीत असतात. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाराज आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुणामुळे दरी पडली, याबाबत स्पष्टच सांगितलं. ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेतील बंडानंतर शहाजीबापूंचा तो संवाद समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर शहाजीबापूंनी राऊतांना वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. आज पुन्हा शहाजीबापूंनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत यांच्यावर शहाजीबापूंनी टीकास्त्र सोडलं.

“उद्धव ठाकरे आणि आमच्यात खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामुळे दरी पडली. यापैकी संजय राऊत आता तुरुंगात आहेत. तर, विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव करेल, असा इशारा शहाजीबापूंनी यावेळी दिला.या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं,” असे शहाजीबापू म्हणाले. “आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या जी दरी पडली, त्यामध्ये शिवसेनेतील दोन राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, आणखी दोघे-तिघे यासाठी कारणीभूत आहेत,” असे ते म्हणाले.

“ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली व देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे बांधले जात आहे. मात्र, पुढील काळात वेगवेगळी गणिते पाहायला मिळतील,” असे सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली. त्यावर शहाजीबापू म्हणाले, “राज्याच्या हितासाठी शिंदे गट, भाजपसोबत मनसेची युती निश्चितपणे व्हावी. येत्या काळात 100 टक्के अशी युती होऊ शकते,”राज्याच्या हितासाठी व कल्याणासाठी भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे अशी युती व्हावी, असे ते म्हणाले. “युती होऊ शकते आणि राज्याच्या हितासाठी व कल्याणासाठी अशी युती निश्चितपणे व्हावी, असे त्यांनी सांगितले.