‘या खासदार बाईंना आवरा’ ऐन दिवाळीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली; मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी

0
6

पुणे, दि. १९ : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. शनिवारवाडा परिसरात घडलेल्या घटनेनंतर त्यांनी भाजपवर आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली.

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरावे. शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाची नाही. शनिवारवाडा हा मराठा साम्राज्य आणि पेशव्यांचा वारसा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहेत. कोथरुडमध्ये नाटकं करून आता कसब्यात येऊन धार्मिक तेढ निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. प्रार्थना असो किंवा दुवा करणे असो, ते दोन्ही श्रद्धेचेच प्रतीक आहे, हे त्यांना समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शनिवारवाड्यामध्ये त्यांनी केलेल्या कृत्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.

शनिवारवाडा परिसरात आज भाजप खासदार मेधा कुलकर्णी, पतीत पावन संघटना आणि इतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. या परिसरात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर आंदोलकांनी त्या ठिकाणी जाऊन गोमुत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण केल्याचा दावा केला. एवढ्यावरच न थांबता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवले.

या वेळी संबंधित परिसरात असलेली मजार हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यांनी परिसरात भगवा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तातडीने थांबवले आणि तो परिसर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. काही वेळाने तणाव निर्माण झाल्यानंतरही पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगितले की पुरातत्व विभागाचे अधिकारी येत आहेत. त्यानंतर काही वेळातच आंदोलकांनी परिसरात भगवा झेंडा फडकवला आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.