यशस्वी जीवनासाठी अविरत संघर्ष हाच पर्याय!

0
262

प्रा. गणेश शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरात व्याख्यान उपक्रम

पिंपरी,दि.२८(पीसीबी) – ‘तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकल्याशी, या युक्तिप्रमाणे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर करून उच्च ध्येय गाठावे. आपल्या जीवनात यश मिळवायचे असेल, तर अवितर संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तरुणांनी स्व:त्व जाणावे. शिक्षण, ज्ञान या शिवाय यश नाही. स्वतः मधले वेगळेपण शोधून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, असे मार्गदर्शन प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थी-युवकांना मार्गदर्शन मेळाव्यांचे नियोजन केले आहेत. या उपक्रमांतर्गत भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “सद्य:परिस्थिती आणि युवकांचे भवितव्य” या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, पिंपरी चिंचवड युवकाध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, पंकज भालेकर, शहर कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, मंगेश असवले, रोहन शिंदे, रमेश कांबळे, रोहित काटे, कुणाल सोनवणे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, ‘जिजाऊंनी जसे शिवबा घडवले’ त्याप्रमाणे आदर्श ठेवून भवितव्याची वाटचाल करणे गरजेचे आहे. चांगले राज्य निर्माण करण्यासाठी शिवबांच्या आदर्शावर चालणे आवश्यक आहे. प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘फटाके मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प केला. तसेच वेगवेगळ्या संकल्पना व्यक्त करून त्या अमलात आणण्यासाठी उपाययोजना सुचवल्या. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जैन यांनी देखील विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांनी या उपक्रमाचे कौतूक केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनिल गंभीरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुग्रीव आडाल यांनी सूत्रसंचालन केले. तुषार ताम्हाणे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया :
विद्यार्थी-युवकांमध्ये आदर्श मूल्ये रुजली पाहिजेत. युवक हा भारत देशाचे भविष्य आहे. पाया भक्कम झाला पाहिजे. त्यासाठी युवकांना मार्गदर्शन मेळावा आयोजित करीत आहोत. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही मतदार संघामध्ये मान्यवरांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जीवनातील प्रसंगाचे दाखले देत प्रा. गणेश शिंदे यांनी युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम निश्चितपणे पथदर्शी ठरणार आहे. – शेखर काटे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपरी-चिंचवड.