यशवंतराव चव्हाण, फारुक अब्दुल्लांसह आजवर ३० जण बिनविरोध खासदार निवडल्याचा इतिहास

0
171

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधीच भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. ना मतदान, ना मतमोजणी… त्याआधीच भाजपला एक खासदार मिळाला आहे. सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल भाजपचे पहिले खासदार बनले आहेत. पण खासदारांचा असा बिनविरोध विजय पहिल्यांदाच झालेला नाही. देशाचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध जिंकली आहे.

मुकेश दलाल हे भाजपचे देशातील पहिले खासदार ठरले आहेत. त्यांच्या विजयामुळे भाजपच्या विजयाची घाेडदौड मतमोजणीआधीच सुरू झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर उर्वरित आठ उमेदवारांनीही निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी, दलाल यांच्या विजय निश्चित झाला.

दलाल हे बिनविरोध विजयी होणारे पहिले खासदार नाहीत. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत 30 हून अधिक खासदार बिनविरोध संसदेत गेले आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. 1962 मध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण बिनविरोध निवडून आले होते.

1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धानंतर त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीत बोलवून संरक्षणमंत्रिपद दिलं होतं. ही जबाबदारी देत असताना त्यांना खासदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते. त्यावेळी नाशिक मतदारसंघातून ते बिनविरोध निवडून गेले होते.

मागील दोन निवडणुका याला अपवाद ठरल्या आहेत. या निवडणुकांमध्ये किंवा दहा वर्षांतील पोटनिवडणुकांमध्ये एकही उमेदवार बिनविरोध विजयी झालेला नाही. याआधी 2012 मध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव कनौज मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाल्या होत्या.
अखिलेश यादव यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत एकही उमेदवार उरला नाही. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, 1951 मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. तर 1957 मध्ये हा आकडा 11 वर पोहाेचला होता, तर 1962 आणि 1967 मध्ये अनुक्रमे तीन आणि पाच उमेदवार विजयी झाले होते. 1971, 1977 आणि 1984 या निवडणुकांमध्येही प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता.