
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
मुंबई दि. 2 ( पीसीबी ) :- यवत येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी सांगितले की, “यवत येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पोलीस प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी.”
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. इथला सामाजिक सलोखा आणि एकात्मता ही आपली ओळख आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न शासन खपवून घेणार नाही.”
“दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल. राज्याच्या प्रमुखांसह पोलीस प्रशासन आणि जिल्हा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“सर्व नागरिकांनी संयम बाळगावा, शांतता राखावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. सामाजिक सलोखा टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राची सहिष्णुता आणि सलोख्याची परंपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.