यवतमाळमध्ये नगरसेवक आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात

0
290

यवतमाळ दि. १७(पीसीबी) – एकनाथ शिंदे गटाशी जुळवून घ्यावे असा सल्ला पत्र लिहून देणाऱ्या वाशिम – यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचा गट आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेला आहे. भावना गवळी समर्थक नगरसेवक पिंटू बांगर यांनी याची घोषणा आज केली. भावना गवळी यांच्या शिंदे गटासोबत जाण्याने यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. यात 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते आहे. बाभूळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची घोषणा केली आहे.

भावना गवळी यांची लोकसभा प्रतोदपदावरुनही उचलबांगडी
लोकसभेच्या प्रतोदपदावरुन काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांची उचलबांगडी शिवसेनेने केली होती आणि त्यांच्याऐवजी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे. मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी यामुळे याबाबत अद्यार लोकसभा सचिवालयाकडून काही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचा प्रतोद कोण, हाही प्रश्न कायम आहे. या निर्णयानंतर भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ईडीच्या भीतीपोटी शिंदेंना पाठिंबा दिल्याचा आरोप
भावना गवळी यांनी १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील पैशांच्या अफरातफरी प्रकरणात त्यांना ईडीने समन्सही बजावले होते. त्यानंतर काही दिवस भावना गवळी या सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हत्या. शिंदे यांच्या बंडानंतर, त्यांची भूमिका समजून घ्यावी असे आशयाचे पत्र देणाऱ्या त्या पहिल्या शिवसेनेच्या खासदार होत्या. तेव्हापासूनच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याचे सांगण्यात येत होते.

यवतमाळमध्ये शिवसेनेला दुहेरी फटका
यवतमाळमध्ये खासदार भावना गवळी आणि माजी मंत्री संजय राठोड हे दोघेही एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे. संजय राठोड यांची आरोपांनंतर मंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येत होती. आता राठोड आणि त्यांचे समर्थकही आता शिंदे गटात सामील झाले आहेत.