यवतमाळची अदिबा ठरणार राज्यातील पहिली मुस्लीम महिला आयएएस

0
2

यवतमाळ : घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम. पण वडिलांनी दिलेले भक्कम पाठबळ अन् स्वत: केलेला निर्धार या बळावर अदिबा अनम या विद्यार्थिनीने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशातून १४२ रँक मिळवत ती आता आयएएस अधिकारी बनणार आहे.

पण एवढेच नव्हेतर, महाराष्ट्रातील पहिली मुस्लीम महिला आयएएस होण्याचा मान अदिबा अनमच्या खात्यात जमा होणार आहे. तिचे पूर्ण नाव अदिबा अनम अश्फाक अहमद. ती यवतमाळच्या भोसा रोड परिसरातील रहिवासी आहे. वडील अश्फाक अहमद हे साधे ऑटोरिक्षा चालक असल्याने गरिबी पाचविला पुजलेली. पण त्यांनी आपल्या मुलीला ‘मोठे’ करण्याचे स्वप्न पाहिले. अदिबानेही या स्वप्नासाठी मेहनत घेतली.

आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १००९ विद्यार्थ्यांपैकी अदिबाला १४२ वी रँक मिळाली आहे. अदिबाने बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळात जिल्हा परिषद शाळेत घेतले. नंतर हज हाऊस आयएएस प्रशिक्षण संस्था आणि नंतर दिल्लीच्या जामिया मिलिया युनिव्हर्सिटीतून यूपीएससीची तयारी केली. सुरुवातीलालाखतीत अपयश आले. पण २०२४ च्या परीक्षेत यशस्वी झाल्यावर ती मुलाखतीतही पात्र ठरली.

मेरा बेटी से नाम रोशन हैं!

अदिबाचे वडील अश्फाक अहमद ऑटोरिक्षा चालक असले तरी ते कसलेले शायरही आहेत. अखिल भारतीय स्तरावर त्यांनी अनेक मुशायरे गाजविले. आपल्या मुलीच्या यशानंतर ते म्हणाले…

सुबह रोशन हैं श्याम रोशन हैं

जिंदगी का निजाम रोशन हैं

लोग बेटो पे नाज करते हैं

मेरा बेटी से नाम रोशन हैं