नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : राज्यात सध्या असलेले घटनाबाह्य सरकार अकार्यक्षम आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव सुरु आहे. राजकारण आणि टेंडरबाजीत गुंतलेल्या राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ आणि चिंतेत आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकच्या शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या रुग्णांच्या मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार या ट्रिपल इंजिन सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. महाराष्ट्रात यमाचा एक रेडा फिरतोय आणि त्या यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत, अशी घणाघाती टिप्पणी संजय राऊत यांनी केले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये १०० पेक्षा जास्त लोक मरण पावलेत. हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनाला अवस्थ करत नसेल तर त्यांचं मन मेलं आहे. ते दिल्लीची ‘मन की बात’ ऐकतात. पण राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरु असलेले मृत्यूचे तांडव त्यांना ऐकायला जात नाही. शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूला राज्य सरकारच जबाबादर आहे. त्यांचं शेतकरी आणि सामान्य माणसाकडे राज्याकडे लक्ष नाही. ठेकेदारी, टेंडरबाजी, पालकमंत्रीपद आणि महामंडळ या सगळ्या गोष्टींमध्येच राज्य सरकार मश्गुल आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीवरही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी स्थापन केला आहे. आता कोणी ऐरागैरा हा पक्ष माझा असल्याचे बोलत आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाची खरी कसोटी आहे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतही राऊत यांनी भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय लवकरात लवकर घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण कालमर्यादेत संपवा, असे सांगितले आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे परग्रहावरची राज्यघटना मानतात, असे दिसते. कारण ते देशाच्या घटनेला मानत नाहीत. त्यामुळे आता शिवसेना आपली भूमिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.