यंदा दहीहंडी होणार धूमधडाक्‍यात; गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी

0
389

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सण, उत्सवावरील सर्वच निर्बंध राज्य सरकारने शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच सण, उत्सव धुमधडाक्‍यात साजरे होणार आहेत. तसेच शहरात आगामी महापालिका निवडणुकीचे वार वाहू लागले आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील विविध भागातील सार्वजनिक दहिहंडी जोरात फुटणार असून गोविंदांना लाखोंचे लोणी चाखायला मिळणार आहे.

दोन वर्ष कोरोनामुळे कलाकारांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये उदासीनतचे, वातावरण होते. यंदा 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण आहे. शहरातील पिंपरीगाव, भोसरी, पिंपळे-गुरव, सांगवी, वाकड, चिखली, निगडीसह इतर ठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाण्याची शक्‍यता आहे. सार्वजिनक मंडळाच्या वतीने आतापासून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदी व मराठी कलाकारांना दहीहंडीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच चुरस लागली आहे. गर्दी खेचून आणण्यासाठी मोठमोठ्या सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाणार आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहिहंडी फोडण्याची पथकांमधील वाढणारी चुरस, गाण्यांच्या स्वरात थिरकणारे सिने तारका, तरुण असे वातावरण यावर्षी दिसणार आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक माजी नगरसेवक, इच्छूकांच्या वतीने दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्‍यता आहे. तर सर्वात उंच दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रूपयांची बक्षिसे ठेवण्यात येण्याची शक्‍यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या दहीहंडीतील हंडी फोण्यासाठी पथकेच नाहीत. त्यामुळे पुणे, मावळ, मुंबई, ठाण्यासह विविध भागातील गोंविदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी येत असतात.