मुंबई, दि. १४ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या प्रकरणावर अद्याप सुनावणी प्रलंबित आहे. हि यैचॆ उद्धव ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दाखल केली आहे. मात्र, ज्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुभाष देसाई यांनी याचिका दाखल केली आहे त्यांच्याच गोटात भूषण देसाई सामील झाले. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करताना काही कारण दिले असले तरी ‘ईडी’ पासून संरक्षण मिळण्यासाठीच ‘हा’ उद्योग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभाष देसाई यांनी अखेरपर्यंत त्यांची साथ दिली. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे नेते शिवसेना सोडून गेले. पण, एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. गजानन कीर्तिकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ हे नेते शिवसेना सोडून जात असताना सुभाष देसाई मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे राहिले.
सुभाष देसाई हे जसे बाळासाहेबांचे एकनिष्ठ तसेच ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतही एकनिष्ठ राहिले. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात त्यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. सतत आठ वर्ष सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते होते.
शिवसेना भाजप सरकारच्या काळात सुभाष देसाई यांच्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खातेच देण्यात आले. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत एक मुद्दा उपस्थित केला होता. देसाई यांच्या बंगल्यावर रहात असलेल्या एका व्यक्तीकडून सातत्याने उद्योग खात्यात हस्तक्षेप केला जात आहे.
उद्योग विभागात दलालाची करणाऱ्या एका व्यक्तीच्या कंपनीत देसाई यांच्या शासकिय बंगल्यावर रहात असलेल्या व्यक्तीने थेट भागीदारी केली, असा आरोप करून शेलार यांनी एकच खळबळ माजविली होती.
त्या कंपनीचा मुळ मालक आणि बंगल्यावरील व्यक्ती उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून आदेश देत असत. आशिष शेलार यांच्या या आरोपानंतर उद्योग विभागाच्या कामात थेट हस्तक्षेप करणाऱ्या त्या कंपनीच्या संबधित व्यक्तींवर ईडीने धाड टाकली. त्यांच्या ताब्यातून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती.