…म्हणे, आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असणार

0
299

– राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवारच बंडाच्या पवित्र्यात

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जात सत्तास्थापन करणार या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच काल अजित पवार यांनी आमदार अपात्र ठरले तरी शिंदे सरकार स्थिर असल्याचे सांगत ‘मविआ’ नेत्यांच्या मनसुब्यांमधील हवाच काढून टाकली. त्यामुळे अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार का ? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते सध्या मुंबईत आहेत. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे बारामती मध्ये असल्याची माहिती आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील ‘काका-पुतण्या’ वादाबाबत चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. महाराष्ट्राला काका-पुतण्या वाद नवीन नाही. या वादाची कारणं राजकीय असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

नऊ महिन्यांपूर्वी जे शिवसेनेचे झाले तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवेसनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केले आणि आमचीच शिवसेना खरी असल्याचा कांगावा केला. निवडणूक आयोगानेही त्यांचीच शिवसेना खरी ठरवली आणि आश्चर्य म्हणजे धनुष्यबाण चिन्ह सुध्दा शिंदे यांच्या गटाकडे सोपविले. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार असल्याने राज्य सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यानंतर पर्याय कोण देणार त्यांना संधी द्यायची अन्यथा राष्ट्पती राजवट लावून नंतर मध्यावधी निवडणुका घेणे हे दोन मार्ग आहेत. शिंदे यांचे १६ आमदार अपात्र ठरले तर पर्याय म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार हे ३० आमदार घेऊन भाजपला मिळणार आणि नवीन सरकार तयार होणार आहे. गेले आठवडाभर या घडामोडींनी वेग घेतला आहे.