‘…म्हणून संतोष देशमुखांना संपवलं’; सुदर्शन घुलेचा खळबळजनक कबुली जबाब

0
21

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेने  पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या का केली यामागील कारणांचा खुलासा त्याने तपास अधिकाऱ्यांसमोर केला आहे. यामुळे प्रकरणात आणखी नवे पैलू समोर आले आहेत.

सुदर्शन घुलेचा खळबळजनक कबुलीजबाब

राज्यात संताप निर्माण करणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी सध्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेने आपली भूमिका स्पष्ट करत पोलिसांसमोर मोठे खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, मस्साजोगमध्ये अवादा कंपनीचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू आहे आणि त्या कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी त्याला वाल्मिक कराड याने सांगितले होते.

सुदर्शन घुलेच्या मते, त्याचा मित्र प्रतीक घुलेचा वाढदिवस होता. त्याच दिवशी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे घुलेच्या मनात राग निर्माण झाला होता. शिवाय, संतोष देशमुख खंडणी मागण्यात अडथळा ठरत असल्याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सर्व तपशील सुदर्शन घुलेने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

पोलीस समोर कबुली देताना घुलेने उघडले सर्व तपशील

पोलिसांच्या चौकशीत सुदर्शन घुलेने, त्याच्यासोबत आरोपी असलेले जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील आपली गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. सुरुवातीला घुलेने आपला सहभाग नाकारला होता, मात्र पोलिसांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढलेला व्हिडीओ दाखवताच त्याची बोबडी वळली आणि त्याने सर्व कबुली दिली.

या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार सुदर्शन घुलेच होता, हे आता स्पष्ट झाले आहे. खंडणीसाठी प्रेरणा वाल्मिक कराडकडून मिळाली असल्याची माहितीही त्याने चौकशीत दिली. त्यामुळे आता कराडची अडचण वाढली असून तपास अधिक खोलात गेला आहे. सीआयडी व एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासाला या कबुलीजबाबामुळे वेग मिळाल्याचे बोलले जात आहे.