….म्हणून शिंदे रुसले आणि गावाला गेले होते, सत्य आले समोर

0
8

– मुख्यमंत्री पदावर सहा महिन्यांसाठी ठेवण्याची मागणी भाजपने फेटाळली

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटले तरी अद्याप राज्याला नवं सरकार लाभलेलं नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून महायुतीने राज्यात तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. मात्र महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही. महायुतीत काही दिवस मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. पाठोपाठ आता गृहमंत्रीपदावरून गोंधळ चालू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचं नेतृत्त्व करण्याची इच्छा होती. मात्र, भाजपाकडून नकार मिळाल्यानंतर शिंदे यांनी स्पष्ट केलं की भाजपा पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नेत्याचं नाव जाहीर करतील मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन. मात्र, शिंदे आता महायुतीच्या सरकारमध्ये ग़ृहमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. गृहमंत्रीपदामुळेच महायुतीच्या चर्चा लांबल्या असून शपथविधी रखडल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद व खातेवाटपासंदर्भातील चर्चेसाठी एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भाजपाकडे किमान सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद दिलं जावं अशी मागणी केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी नव्या सरकारमध्ये सुरुवातीचे सहा महिने मुख्यमंत्रीपद मागितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलं आहे. एका वरिष्ठ भाजपा नेत्याच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मात्र भाजपाने ही मागणी तिथल्या तिथे फेटाळून लावली. असं केल्यास राजकारणात एक चुकीचं उदाहरण जाईल, असंही भाजपाने स्पष्ट केलं. सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची व्यवस्था नाही, असा निर्णय घेतल्याने देशाच्या राजकारणात एक चुकीचं उदाहरण तयार होईल. त्याचबरोबर प्रशासनावर त्याचा विपरित परिणाम होईल, असं भाजपाने शिंदे यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं. भाजपा कार्यकर्त्यांनाही हे आवडणार नाही, असंही स्पष्ट केलं.