…म्हणून भाजपला २०२४ साठी राष्ट्रवादी बरोबर पाहिजे

0
276

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – विद्यमान राजकीय परिस्थितीनुसार लोकसभेच्या आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे गणित जुळणे कठीण असल्याने राष्ट्रवादीला सत्तेत घेणे ही भाजपची अपरिहार्यता आहे. मात्र भाजपला शरद पवारांची नाराजी नकोय. त्याची अनेक कारण आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ईडीची नोटीस आली तर खुद्द पवारच ईडीच्या कार्यालयात जाऊन बसले. राज्यात राजकीय धुराळा उडाला आणि राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण तयार झाले. पवारांकडून महाविकास आघाडीची मोट बांधली जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या मदतीने पहाटेचा शपथविधी घेतला खरा; पण शरद पवारांनी हा डावही उलटून टाकला.

आताही लोकसभेच्या गणितासाठी महाराष्ट्रात भाजपला राष्ट्रवादीची गरज आहे. मात्र, अजित पवार आमदारांना घेऊन सोबत येण्यापेक्षा त्यांनाही शरद पवारांच्या मर्जीविना नको आहेत. तसे घडले तर शरद पवारांमध्ये वातावरण ढवळून काढण्याची क्षमता असल्याने जुळणारे गणित बिघडण्याची पवारांमध्ये क्षमता असल्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे पवारांच्याच मर्जीने किंवा त्यांची नाराजी नसेल असेच समीकरण भाजपला हवे आहे.

सध्या राज्यातील समीकरणात छोटा पक्ष असूनही भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतला समान वाटा दिला. सुरुवातीला सरकारबद्दल गवगवा झाला. मात्र, आता अंतर्गत ओढाताण तर सुरू झालीच असून सामान्यांमधील सरकार व मुख्यमंत्री शिंदेंची क्रेझही कमी होत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे वज्रमूठ सभांना प्रतिसाद आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती कायम आहे. त्यामुळे आता भाजपला राष्ट्रवादीची निकड आहे. त्यामुळे समीकरणात अजित पवार आले तर एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी एकाला केंद्र सरकारमध्ये मानाचे पान मिळू शकते. राष्ट्रवादीतून देखील एखादा नेता केंद्रात जाऊ शकतो. कदाचित अजित पवार यांना क्रमांक एकची खुर्चीही मिळू शकते, असेही जाणकार सांगतात.