…म्हणून त्यांनी चक्क रस्ताच नेला चोरून ? अजबच…!

0
247

देश, दि. ०६ (पीसीबी) – चोरी म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? सोनं, चांदी, हिरे, पैसे, गाड्या किंवा अन्य महागड्या वस्तू. पण बिहारमध्ये एक अनोखी चोरी झाली आहे. अशा चोरीबाबत तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. बिहारमधील काही गावकऱ्यांनी चक्क रस्त्याची चोरी केलीये. ऐकूनच चकित झालात ना? पण होय, हे खरं आहे. या चक्रावून टाकणाऱ्या चोरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.

बिहारमधील जहानाबाद येथील बीघा या गावात मुख्यमंत्री ग्राम रस्ते योजनेअंतर्गत एक रस्ता तयार केला जात होता. पण मीडिया रिपोर्टनुसार या गावातील लोकांनी या रस्यासाठी वापरलं जाणारं साहित्यच चोरून नेलं. सीमेंट, खडी, वाळू अगदी काहीही ठेवलं नाही. काही जणांनी तर रस्ता खोदून त्यामधील खडी गायब केली. खराब रस्त्यांबाबत अनेकदा तक्रारी केल्या जातात. पण या गावातील लोक तर रस्ताच होऊ देत नाहियेत असा दावा तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. यापूर्वी देखील गावकऱ्यांनी रस्ता चोरून नेल्याची घटना या ठिकाणी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून देशभरातील नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.