…म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले , फडणवीस यांनी सांगितला किस्सा

0
174

नागपूर, दि. ५ (पीसीबी) – एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासह भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. सोमवारी नव्या सरकारने विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं. या सर्व घडामोडीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार, अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद कस स्वीकारलं यामागची खरी स्टोरी फडणवीसांनी आज सांगितली.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले याची माहिती दिली. आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला नाही. आग्रह केला असता तर मुख्यमंत्री पद मिळालं असतं. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा होता. मी म्हटल म्हणून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण सरकारच्या बाहेर राहुन पक्ष संघटनेत काम करणार होतो. मात्र मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला. त्यांनी मला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सांगितलं. त्यानंतर अमित शहा यांचाही फोन आल्याचं फडणवीसांनी म्हटलं.

दोन शक्तीस्थळं नको होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अमित शाह यांचा फोन आला. त्यावेळी ते मला म्हणाले की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. तुम्ही सरकारच्या बाहेर राहून चालणार नाही. काँग्रेसच्या काळात मुख्यमंत्री असला तरी त्यावर बाहेरून नियंत्रण ठेवलं जायचं. अर्थात दोन शक्तीस्थळे असायची. यावरून आपण काँग्रेसवर टीका करत आलो आहोत. मग आपण तशा पद्धतीने काम करणे उचित होणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्या, जेणेकरून दोन शक्तीस्थळे होणार नाही, असं शहा यांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलं.