…म्हणून आमदार सुनिल शेळके यांनी मुंबई-पुणेे एक्सप्रेसवे बंद केला नाही

0
274

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : मावळ तालुक्यातील (जि.पुणे) व त्यातही कामशेतमधील गावठी दारुभट्या व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांनी आज या भट्यांवरील दारुचे कॅन घेऊन कामशेत पोलिस ठाण्यावर महिलांसह शेकडोंचा धडक मोर्चा काढला. त्यानंतर ते त्यासाठी तसेच कामशेतच्या पीआयची बदली करण्याच्या मागणीकरिता पुणे-मुंबई हायवे बंद करण्यासाठी चालले होते. मात्र, पुणे ग्रामीणचे एसपी डॉ. अभिनव देशमुख यांनी याप्रश्नी तत्पर कारवाईचे आश्वासन दिल्याने हायवेवरील आंदोलन टळले. परिणामी अगोदरच मोठी वाहतूक, गर्दी व कोंडी होणाऱ्या रविवारच्या दिवशी पुणे- मुंबई महामार्ग ठप्प झाला नाही.

दरम्यान अवैध गावठी दारूभट्या व धंद्यांना अभय देणाऱ्या कामशेत पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाची उद्यापर्यंत बदली झाली नाही, तर या भट्यांवरील दारूचे फुगे, कॅन घेऊन विधानसभेत हा प्रश्न आमदार शेळके मांडण्याची दाट शक्यता आहे. कारण तसा इशाराच त्यांनी आज हायवेवरील आपले आंदोलन स्थगित करताना दिला आहे. त्यामुळे उद्याच कामशेतच्या पीआयची बदली होण्याची शक्यता आहे. तसं झालं, नाही, तर हा प्रश्न विधीमंडळात उपस्थित होईल. त्यानंतर, मात्र त्यापेक्षा कडक कारवाई राज्य सरकारकडून केली जाण्याचा संभव आहे.

या महिन्याच्या दोन तारखेला मावळ तालुक्यातील (जि.पुणे) कोथूर्णे येथे सातवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्यामुळे जिल्हा हादरून गेला. स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांनी हा प्रश्न सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला. गावठी दारुच्या नशेतील तरुणाने हे घृणास्पद कृत्य केले असल्याने आपल्या तालुक्यातील सर्वच अशा भट्या व धंदे करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

त्यासाठी त्यांनी ही घटना घडलेल्या कामशेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस ठाण्यावरच गावठी दारुचे फुगे, कॅन घेऊन मोर्चा आज नेला. त्यानंतर ते हायवे बंद करण्यासाठी चालले होते. मात्र, तेवढ्यात एसपी देशमुखांचा मोबाईल आला. त्यांनी उद्यापर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच आक्रमक व संतप्त शेळके शांत झाले.

तत्पूर्वी मोर्चेकऱ्यांनी पीआयची बदली झालीच पाहिजे या घोषणांनी कामशेत पोलिस ठाण्यासमोरील परिसर दणाणून सोडला होता. त्यांच्यासमोर बोलताना शेळके आक्रमक व संतप्त झाल्याचे पहायला मिळाले. स्थानिक पोलिस हफ्ते घेऊन अवैध धंद्यांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते राजकारण आणि जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करीत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. बाहेरचे लोक इथे येऊन पोलिसांच्या जीवावर जमिनीचे व्यवहार करतात आणि त्याच पोलिसांनाच दारुभट्या दिसत नाही, खूनी सापडत नाहीत, याबद्दल त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. दीड वर्षे हे गावठी दारूचे धंदे बंद करण्याची मागणी मी स्वत करूनही ते सुरुच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.