… म्हणून अजित पवार यांचा जरंडेश्वर घोटाळा निवाळला

0
335

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – आधी भाजप नेत्यांकडून राष्ट्र्वादीवर आरोप करण्यात आले. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर काही दिवसात अजित पवार यांनी भाजसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते युती सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आलं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. सहकार महर्षींचे आख्यान! या शीर्षकाखाली हा आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी निशाणा साधलाय.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
जे भाजपच्या गोटात जात नाहीत त्यांच्या सहकारी संस्था, बँका, कारखान्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून जेरीस आणायचे, त्या संस्था मोडीत काढायच्या व आपापल्या लोकांना त्या ताब्यात घ्यायला लावायचे असे हे ‘सहकारी ‘ चळवळीचे नवे मार्ग भाजप राजवटीत निर्माण झाले. राजकारणाने सहकारी चळवळीचा घात केला तो असा . पक्ष फोडण्यासाठी व सरकारे खाली खेचण्यासाठी सहकारी चळवळीचा गैरवापर झाला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या व्याख्यानातून हा मुद्दा तेवढा निसटला! व्याख्यान द्यायला आले, पण व्याख्यानाचे शेवटी आख्यान झाले. व्याख्यान सत्यावर आधारित असते . आख्यानात कपोलकल्पित गोष्टीचा भर असतो!

गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र दोघांचेही वैशिष्ट्य असे की, त्यांच्या कथनी आणि करणी यात अंतर असते. ते बोलतात तसे करीत नाहीत. गृहमंत्री शहा शनिवारी मुंबईत गणेश दर्शनासाठी आले. त्यांनी दर्शन घेतले व नंतर ‘सहकार’ या विषयावर एक व्याख्यान झोडले. गृहमंत्री शहा यांनी केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले व त्याचा कार्यभार त्यांनी स्वतःकडेच ठेवला. आपल्या देशात अनेक राज्यांतील राजकारण हे सहकाराशी जोडले आहे. त्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती असावीत म्हणून गृहमंत्र्यांनी सहकार खाते स्वतःकडे ठेवले.

महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांत सहकार क्षेत्रात मोठे काम झाले आहे. सहकार हा खरं तर राज्याच्या अखत्यारीतला विषय. केंद्राने त्यात हस्तक्षेप करू नये असे संकेत आहेत, पण अमित शहा यांनी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण केले ते फक्त राजकारणावर दबाव ठेवण्यासाठीच. सहकारात राजकारण कोणी आणले, याचे चिंतन खरं तर भाजपने करायला हवे.

मुळात सहकार क्षेत्रात भाजपचे काहीच योगदान नाही, पण आज सत्तेच्या बळावर अनेक सहकारी संस्था, बँकांवर या लोकांनी संघ विचाराची माणसे नेमून संस्थांवर दरोडा टाकला आहे. शिखर बँक हा राज्याच्या सहकाराचा कणा आहे. त्या शिखर बँकेत 70 हजार कोटींचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसने केला असा आरोप पंतप्रधान मोदी करतात व पुढच्या 72 तासांत ज्यांच्यावर शिखर बँक घोटाळय़ाचा आरोप आहे. ते अजित पवार त्यांच्या गटासह भाजपच्या गोटात सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. सहकाराचे हे कोणते स्वरूप म्हणायचे?