…म्हणून अजितदादा नाट्य संमेलनाकडे फिरकलेच नाहीत

0
194

पिंपरी चिंचवड, दि. ५ (पीसीबी) : १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने काका आणि पुतणे एकत्र दिसतील असे वाटत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे शरद पवार, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

सकाळी सातच्या सुमारास मोरया गोसावी मंदिरापासून नाट्य दिंडीला सुरुवात झाली. यात मराठी सिनेकलाकारांनी हजेरी लावली होती. चिंचवडमधील मोरया गोसावी क्रीडांगणात नाट्य संमेलनाचे उद्घाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी काका आणि पुतणे अजित पवार हे एकत्र येतील असे वाटत होते, पण अजित पवार मात्र या उद्घाटनाला आले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांचा अधिकृत दौरा होता. मात्र तरीही ते उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. दरम्यान, नाट्य संमेलन उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.