मोशी, दि. १९ (पीसीबी) : मौजमजेसाठी वाहन चोरी करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
प्रसाद भारत पांडव (वय 23, रा. रमेश सस्ते यांचे भाडयाच्या खोलीत, मोशी) आणि सचिन अशोक सुदाम (वय 24, रा. विश्वकर्मा कॉलनी, वेरुळ ता. खुलताबाद जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सचिन मोरे व प्रमोद गर्जे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशीतील अग्निशामक केंद्र जवळ सापळा लावून दोन संशयितांना अटक केली.
आरोपींच्या ताब्यात मिळालेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी डिसेंबर 2022 मध्ये मोशी येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पिंपरी चिंचवड, शिर्डी तसेच सोलापूर परीसरातुन बुलेट, पल्सर, यामाहा, स्प्लेंडर, हिरो डिलक्स महागड्या दुचाकी चोरी करून त्या संभाजीनगर, अहमदनगर या भागामधील नागरीकांना विक्री करण्याकरीता मोशी येथील सस्तेवस्ती येथे लपवुन ठेवल्या असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी 5 लाख रुपये किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. यामुळे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, चाकण, चिंचवड, शिर्डी आणि मद्रुप पोलीस ठाण्यातील (सोलापूर) प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपी प्रसाद पांडव हा सराईत वाहनचोर आहे. त्याला यापूर्वी भोसरी आणि अहमदनगर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणी अटक केली होती. तसेच तो कामासाठी मोशीत आल्याचे सांगत त्याने खोली भाड्याने घेतली होती.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार सचिन मोरे, अमित खानविलकर, गणेश महाडीक, प्रमोद गर्जे, स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली आहे.