मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक; 12 दुचाकी जप्त

0
174

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) – मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सूर्यकांत बळीराम आडे (वय 25, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी तानाजी आमले यांनी त्यांची दुचाकी कोलते पाटील समोर पार्क केली. भर दिवसा चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये एक व्यक्ती आमले यांची दुचाकी चोरून नेताना आढळून आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढला. दुचाकी चोरणारा व्यक्ती पिंपळे सौदागर येथे राहत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. तसेच तो वाकड ब्रिज येथे येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कोलते पाटील समोरून एक दुचाकी चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यासह 12 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 3 लाख 60 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील चार, देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन, वाकड, तळेगाव दाभाडे, चिखली, हडपसर, इंदापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे 11 गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित एका दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोन्याबापु देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बापूसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, मंगेश सराटे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी केली आहे.