पिंपरी, दि. २७ ‘हजारो वर्षांची मौखिक परंपरा लाभलेली मराठी ही मुळातच अभिजात भाषा आहे!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डाॅ. केशव सखाराम देशमुख यांनी खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्त केले. मराठी भाषा गौरवदिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक रचित ‘काव्य आविष्कार’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डाॅ. देशमुख बोलत होते. यावेळी कवितासंग्रहाच्या ई-आवृत्तीचेही ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच साहित्यिक प्रदीप गांधलीकर, शाळेचा माजी विद्यार्थी व युवा उद्योजक नीलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक नटराज जगताप, मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालविभाग प्रमुख आशा हुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डाॅ. केशव देशमुख पुढे म्हणाले की, ‘सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने मराठीचे पहिले विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन केले आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. महाराष्ट्रातील सर्व आस्थापनांमध्ये लोकव्यवहारासाठी मराठीचा कटाक्षाने वापर करण्यात यावा, असा शासकीय ठराव
नुकताच संमत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मराठीची ज्ञानभाषा म्हणून वाटचाल सुरू झाली आहे. ‘काव्य आविष्कार’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या लेखनप्रतिभेला प्रोत्साहन मिळून भावी काळात यांच्यातून प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होतील!’ वि. म. कुलकर्णीलिखित ‘माझी मराठी’ या कवितेच्या सामुदायिक अभिवाचनाने देशमुख यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला.
प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अंजली सुमंत यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी रसग्रहण, कविता सादरीकरण आणि वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा करीत मान्यवरांकडून दाद मिळविली; तर अश्विनी बाविस्कर यांनी ‘आई’ या कवितेचे अभिवाचन करून उपस्थितांना अंतर्मुख केले.
अतुल आडे, श्रद्धा होनशेट्टे, कृत्तिका काळे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी पोळ यांच्या लोकगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सुनीता घोडे यांनी आभार मानले.