मोहित कंबोज ईडी प्रवक्ता?

0
449

पुणे, दि. १७ (पीसीबी) – राज्यात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार प्रकरणी ईडी कारवाई होण्याआधी एकतर किरीट सोमय्या गौप्यस्फोट करतात किंवा गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नवं चर्चित नेते मोहित कंबोज करत असतात. आज नेमके अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनतेच्या मूळ प्रश्नांना दुर्लक्षित करण्यासाठी मोहित कंबोज यांनी अजित पवार यांना लक्ष्य करत ट्विट केले आणि संपूर्ण लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. कंबोज हे ईडी चे प्रवक्ते आहेत काय, असा खडा सवाल आम आदमी पार्टीचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी केली आहे.

आपल्या प्रसिध्दीपत्रात कुंभार म्हणतात, अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचा भाजपने अत्यंत सोईस्करपणे वापर केला. २०१४ साली अजित पवारांना १०० दिवसांत जेलमध्ये टाकू म्हणणाऱ्या भाजपने ५ वर्षे काहीच न करता २०१९ साली आपल्या ८० तासांच्या औटघटकेचे सरकार कडून अजित पवार यांना क्लीन चिट देण्याचे पुण्य कर्म केले. आता ३ वर्षानंतर पुन्हा तेच गुऱ्हाळ सुरू केले आहे. आता जर अजित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर नारायण राणे, विजयकुमार गावित, राधाकृष्ण विखे यांच्याप्रमाणे त्यांना पण मंत्रिपद देण्यात येईल याबद्दल राज्यातील जनतेच्या मनात मुळीच शंका नाही.

आम् आदमी पक्षाच्या दृष्टीने मोहित कंबोज यांच्या माध्यमातून भाजपने हे प्रकरण केवळ अधिवेशनात टाईम पास करण्यासाठी आणि आपल्या अभूतपूर्व घोडेबाजाराने स्थापन झालेल्या सरकार बद्दल लक्ष हटविण्यासाठी हा डाव मांडलेला आहे. ईडी सारख्या अत्यंत प्रभावी यंत्रणेचे भाजपने अक्षरशः खेळणे करून टाकले आहे, बाजारबुजगे लोक इडी कुणावर कारवाई करणार याचा गौप्यस्फोट करत आहेत. भाजपला जर खरंच काही करायचे असेल तर प्रकरण तडीस न्यावे अन्यथा अजित पवार भाजपकडून मंत्री झालेले दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, असेही कुंभार यांनी म्हटले आहे.