पिंपरी,दि. ४( पीसीबी ) – जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – शाहू – फुले – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेचा प्रारंभ बुधवार, दिनांक ०७ मे २०२५ पासून होत असून दररोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. व्याख्यानमाला वीसपेक्षा जास्त वर्षे जुनी असून नेहमीप्रमाणे राज्यातील विचारवंतांच्या विविध विषयांच्या वरील विचार मंथनातून वैचारिक मेजवानी मिळणार आहे.
श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेत बुधवार, दिनांक ०७ मे रोजी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी : सत्य – अहिंसेचे पुजारी!’ या विषयावर विचार मांडून पहिल्या पुष्पाची गुंफण करतील. गुरुवार, दिनांक ०८ मे रोजी सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने ‘शिवराय ते भीमराय!’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक ०९ मे रोजी सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील ‘छत्रपती संभाजीमहाराज… धगधगती अंगारगाथा!’ या विषयावर तिसऱ्या पुष्पाची गुंफण करतील. शनिवार, दिनांक १० मे रोजी ज्येष्ठ विचारवंत अशोक वानखेडे (टायगर) ‘शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भारतीय संविधान : भारताची दशा आणि दिशा! (नेहरू ते मोदी)’ या विषयावर चौथे पुष्प गुंफतील. रविवार, दिनांक ११ मे रोजी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डाॅ. हेमंत देसाई ‘महाराष्ट्राची दशा आणि दिशा! (यशवंतराव ते देवेंद्र)’ या विषयावरील पाचवे पुष्प गुंफतील. व्याख्यानमालेतील अंतिम पुष्प सोमवार, दिनांक १२ मे रोजी भारुडसम्राट ह. भ. प. लक्ष्मण महाराज राजगुरू ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!’ या विषयाच्या माध्यमातून गुंफतील. नि:शुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्य संयोजक मारुती भापकर तसेच पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती कार्यवाह राजेंद्र घावटे यांनी केले आहे.