मोशी येथील खुनाचा दरोडा विरोधी पथकाने केला उलगडा

0
152

मोशी, दि.९ (पीसीबी) – एका तरुणाला रिक्षातून आणून मोशी कचरा डेपो समोरील 90 फुटी रोडवर त्याचा खून करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या गुन्ह्याचा दरोडा विरोधी पथकाने उलगडा केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

अमोल पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत सुधाकर कांबळे (वय 19, रा. गुळवे वस्ती, भोसरी), शुभम अशोक बावीस्कर (वय 23, रा. धावडे वस्ती, भोसरी), विजय उमेश फडतरे (वय 22, रा. गायकवाड वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपो समोर तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून करण्यात आला. दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सागर शेडगे आणि गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, या गुन्हयातील आरोपी हे एमएच 14/जेपी 2439 या रिक्षामध्ये बसून चाकणच्या दिशेने जात आहेत. त्यानुसार दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी चाकणच्या दिशेने जात असताना लांडगेनगर भोसरी येथून संशयित रिक्षा पकडली.

रिक्षातून प्रशांत कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले. दोन्ही साथीदार नारायणगावच्या दिशेने गेले असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी नारायणगाव गाठले. नारायणगाव बस स्टँडवर दोन तरुण संशयितरित्या थांबले होते. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोशी येथे एका तरुणाचा खून केल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश सावंत, सुमित देवकर, चिंतामण सुपे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.