मोशीमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोड

0
323

भोसरी, दि. 29 – मोशी येथे वाहनांची तोडफोड झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि. 26) पुन्हा याच परिसरात वाहनांच्या तोडफोडीची घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मोशी परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुनील मोहन जाधव (वय 23, रा. राजे संभाजीनगर, लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश बालाजी घोकणे (वय 31) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश घोकणे हे बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गाडी पार्क करून घरी चालले असता आरोपी सुनील जाधव हा तिथे आला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. त्यानंतर आरोपीने कोयत्याने फिर्यादी यांच्या टेम्पोसह इतर आणखी दोन वाहनांच्या काचा फोडल्या.

ॠषीकेश युवराज बनसोडे (वय 21, रा. साई कॉलनी, लक्ष्मीनगर, मोशी) या आरोपीने सोमवारी (दि. 24) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास लक्ष्मीनगर, मोशी या परिसरात वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा त्याच परिसरात घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.