मोरवाडीत प्रशासनाचे वाजले बारा, लोकप्रतिनिधीच्या हाती मदत कार्याची धुरा

0
134

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : काल झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः सामान्य नागरिकांना जेरीस आणले. मोरवाडी सम्राट चौकात तर तळे साचले होते. अजमेराकडून येणार पाण्याचा प्रवाह थांबण्याचे नाव घेत नव्हता. रात्रीपासूनच लाल टोपी नगर भागात तर प्रत्येक घरात पावसाचे पाणी शिरले होते. वाढता पाऊस आणि घरात शिरणारे त्यामुळे होणारे नुकसान यामुळे नागरिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आस लावून होते. एकंदरीतच वातावरण पाहता प्रशासन देखील हतबल झाले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी माजी उपमहापौर आणि नगरसेवक तुषार हिंगे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत नागरिकांना मोरवाडी आयटीआय येथे हलविण्यास सुरवात केली. तेथे जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. अन्यथा पावसाचे रौद्र रूप पाहता मोठा अनर्थ झाला असता.

भर पावसात सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत परिस्थीची पाहणी करण्यात आली आणि प्रशासन देखील मदत कार्यात उतरले. आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून लालटोपी नगर, विद्यानगर तसेच दत्त नगर येथील नागरिकांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले होते त्यासोबतच घरपोच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.