श्री मोरया गोसावी मंदिरात विविध पारंपरिक कार्यक्रम; भाविकांची गर्दी
चिंचवड दि. १५ (पीसीबी)- चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 461 व्या संजीवन समाधी महोत्सवाचा बुधवारी (दि.14) उत्साहात समारोप झाला. मोरयाच्या जयघोषात समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करीत महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. सुमारे 90 हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या महोत्सवात 10 ते 14 डिसेंबरच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सुगम संगीत, जुगलबंदी, व्याख्यान, योगासन वर्ग, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच सनई-चौघडा वादन, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सौरयाग, रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिराचा समावेश होता. देऊळमळा पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आला होता.
मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते बुधवारी पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा झाली. सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. चरित्र पठण आणि चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना झाली. रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरु असलेल्या महाप्रसादाचा 90 हजारहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा येथे रात्री 10 वाजता धुपारती होऊन महोत्सवाची सांगता झाली.