मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

0
3

नांदेड दि. 10 (पीसीबी) : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मोबाईलसाठी वडिलांकडे तगादा लावणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणाने आपलं आयुष्य संपवलं, आणि त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून वडिलांनीही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गाव हादरवून गेले आहे.

ओमकार पैलवार (१७) नावाच्या तरुणाने मोबाईल घेऊन देण्याची मागणी वारंवार वडिलांकडे केली होती. मात्र, ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. या निराशेतून ओमकारने घरातील खोलीत गळफास लावून आपलं जीवन संपवलं. मुलाच्या या कृतीने कुटुंबीयांना धक्का बसला. मुलाच्या मृत्यूची बातमी वडील राजू पैलवार यांना समजताच ते प्रचंड अस्वस्थ झाले. आपल्या मुलाच्या दुःखात त्यांनीही शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. एका दिवसात दोन मृत्यूंनी कुटुंबीय आणि गावकऱ्यांना धक्क्यात टाकले आहे.

पिता-पुत्राच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मोबाईलसारख्या गोष्टीसाठी जीव गमावणं आणि नंतर पित्यानेही तोच निर्णय घेणं हे दुर्दैवी आहे, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले.

ही घटना कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळवणारी आहे. मुलांच्या मानसिकतेकडे पालकांनी लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे, हे यामुळे स्पष्ट होते. तांत्रिक वस्तूंच्या मागणीसाठी मुलं आणि पालक यांच्यात होणारे मतभेद गंभीर रूप धारण करत असल्याचेही या घटनेतून दिसून येत आहे.