रहाटणी, दि. ५ (पीसीबी) – यूट्यूब चॅनलवर कमेंट करण्यासाठी पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 16 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 29 ऑक्टोबर 2023 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रहाटणी येथे ऑनलाइन घडला.
हरेंद्र दिलबर सिंह (वय 35, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली पटेल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हाट्सअप नंबरवर अनोळखी नंबर वरून मेसेज आला. त्यामध्ये दिलेल्या लिंक मधील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करण्यास सांगण्यात आले. दररोज 24 कमेंट आणि लाईकचे टार्गेट देऊन पहिल्या कमेंटला दीडशे रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक कमेंटला 50 रुपये दिले जातील. त्यातून तुम्ही दिवसाला एक हजार 500 ते चार हजार रुपये कमवाल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करण्यास सांगितले. ग्रुप वरील अनोळखी महिलांनी फिर्यादीस वेगवेगळे टारगेट देऊन पैसे भरण्यास प्रवृत्त केले. यामध्ये फिर्यादी यांची 16 लाख 11 हजार 80 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.