हैद्राबाद, दि. ६ (पीसीबी) – तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “पंतप्रधान मोदी आपल्या सावकार मित्रासाठी देशातील राज्यांवर त्यांनी आयात केलेला चारपट, पाचपट महागडा कोळसा खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. तसेच हा १० टक्के आयात कोळसा न घेतल्यास कोल इंडियातून पुरवठा बंद करू अशी धमकी देत आहेत,” असा आरोप केसीआर यांनी केला. ते हैदराबादमध्ये घेतलेल्या सभेत बोलत होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा देखील उपस्थित होते.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, “मोदींना मला एक प्रश्न विचारायचा आहे. देशात देवाने म्हणा किंवा निसर्गाने १०० वर्षे पुरेल इतकी कोळशाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. अजूनही सर्व्हे सुरू आहेत आणि त्यात आणखी कोळसा सापडत आहे. दरवर्षी ५,००० ते १०,००० मिलियन टन कोळसा काढला जातो. इतके नैसर्गिक संसाधनं असताना असताना तुम्ही परदेशातून कोळसा आयात का करता? याचं उत्तर द्या. तुमच्या भाषणात उत्तर द्या, म्हणजे संपूर्ण देशाला कळेल. तुमची काय अडचण आहे?”
“मोदींची अडचण ही आहे की त्यांना त्यांच्या सावकार मित्रांना मदत करायची आहे. तुमचा तर नाईलाज आहेच, पण तुम्ही राज्यांच्या सरकारांवरही दबाव टाकत आहात. आदेशावर आदेश दिले जात आहेत. राज्यांना १० टक्के आयात केलेला कोळसा वापर करा, नाहीतर कोल इंडियातून तुमचा कोळसा पुरवठा बंद केला जाईल, अशी धमकी दिली जात आहे. ही काय दादागिरी, जबरदस्ती आहे? ही लोकशाहीची मर्यादा आहे का?” असा प्रश्न केसीआर यांनी विचारला.