पुणे, दि. २७ (पीसीबी) : मोदी सरकारला हटवण्यासाठी देशभरातील भाजप विरोधक इंडिया फ्रंटच्या नावाखाली एकत्र येत आहेत. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागलेले असतांना राज्यातील समाजवाद्यांनी देखील इंडियाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात झालेल्या एका मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व समाजवाद्यांनी आपले पक्ष व राहुट्या वेगळ्या असल्या तरी भाजपाला हटवण्यासाठी इंडियासोबत एकजुटीने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी जनता परिवारातील विविध पक्ष आणि संघटनांमधील ज्येष्ठ नेते, विचारवंत आणि प्रमुख कार्यकर्त्यांची संवाद बैठक नुकतीच पुण्यात झाली.
जनता दल (यूनाइटेडचे) राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या प्रयत्नाने झालेल्या विरोधी पक्षांच्या एकजुटीचे महाराष्ट्रातील समाजवादी संघटनांनी स्वागत केले आहे. बैठकीतील अनेक नेत्यांनी नितीशकुमार आणि राहुल गांधी यांचे अभिनंदन केले.
डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, पन्नालाल सुराणा, डॉ. अभिजीत वैद्य, गंगाधर पटने, अजमल खान, नितीन वैद्य, शशांक राव, अतुल देशमुख, सच्चिदानंद शेट्टी, मलविंदरसिंह खुराणा, आदिवासी नेते काळूराम काका धोदडे, शब्बीर अन्सारी, सुभाष वारे, असीम रॉय, सुभाष लोमटे, सोमनाथ रोडे, अजित शिंदे, मनीषा पाटील, संभाजी भगत, अरुण म्हात्रे, जतीन देसाई, प्रभाकर नारकर, शरद जावडेकर, हसन देसाई, विजय कंडारे, मिलिंद टिपणीस, मोहन वाडेकर यांच्यासह समाजवादी जनता परिवारातील पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दलाचे (सेक्युलर) प्रदेश अध्यक्ष शरद पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या बैठकीला आपले समर्थन कळवले होते. समाजवादी विचारधारेतील सर्व गटांनी पुन्हा एक परिवार म्हणून का उभं राहू नये ? भूतकाळातील चुका, दुरावा, मतभेद, मनभेद सारं काही विसरून एकत्र यायला काय हरकत आहे ? आपल्या सर्वांचं मूळ घर एकच तर होतं, या भूमिकेतून राज्यातील सर्व समाजवादी एक झाले. अशा पद्धतीचे मेळावे लवकरच नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण आणि मुंबईत होणार आहेत, अशी माहिती मेळाव्याचे संयोजक राजा कांदळकर यांनी दिली.











































