मोदी सरकारच्या योजना शिरूर मतदारसंघातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवल्या, तरी शिरूरला विजय निश्चीत

0
345

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : पक्षाचा खासदार नसलेल्या देशातील १४४ जागा २०२४ ला जिंकण्याचा निर्धार भाजपने आतापासूनच केला आहे. त्यात महाराष्ट्रातील शिरूर, बारामतीसह १६ मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघाची जबाबदारी पक्षाच्या मंत्र्यांकडे देण्यात आली असून ते सध्या तेथे दौऱ्यावर आहेत. शिरूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुकासिंह यांच्या या दौऱ्याची सुरवात आज (ता.१४ सप्टेंबर) भोसरीतून झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजना शिरूर मतदारसंघातील जनतेपर्यंत प्रामाणिकपणे पोचवल्या, तरी शिरूरला विजय निश्चीत आहे, असा दावा रेणूकासिंह यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्याच बैठकीत केला. त्या शिरूर लोकसभेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भोसरीमध्ये बोलत होत्या.

यावेळी त्यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावणारे भाषण केले. तत्पूर्वी त्यांचे सकाळी पुणे विमानतळावर शिरूर लोकसभेच्या निवडणूक प्रभारी, पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ, पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे आदींनी स्वागत केले. तेथून त्या भोसरीतील कोअर कमिटी बैठकीला गेल्या. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष आणि सेल अध्यक्षांची बैठक घेत त्यांना सक्रिय भूमिका निभावण्याचे आवाहन त्यांनी केले.

दोन दिवसांपूर्वी (ता.१२) आमदार मिसाळ यांनीही २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे भाजपचा उमेदवार निवडून येणार, असा दावा केला होता. त्यामुळे तेथून २०२४ ला लढण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार व आता शिंदे गटात गेलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे काय होणार अशी चर्चा मतदारसंघात आता सुरु झाली आहे.

तीन दिवसांत रेणूकासिंह यांचे शिरूर मतदारसंघात पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी, असे संघटनात्मक आणि सार्वजनिक २१ कार्यक्रम होणार आहेत.