मोदी-शाहच म्हणतील शिंदे गँगशी आमचा संबंध नाही

0
147

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – “गुंडगिरीला शिंदे सरकारचा राजाश्रय मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील एक आमदार शिंदेच्या खास माणसावर गोळीबार करतात. उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पुण्यात एका कुख्यात गुंडाची भेट घेतात. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यावरून गुंडाची टोळी हाताळली जात आहे. यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. गुंडांना जामिनावर बाहेर काढले जात असून याची यादी आम्ही लवकरच प्रसिद्ध करू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायद्याची चाड असेल तर त्यांनी गृहमंत्री म्हणून काम करून दाखवावे. ते एकनाथ शिंदे यांच्या दहशतखाली आहेत का? महाराष्ट्राला गुंडगिरीचा जो डाग लागत आहे, त्यात तुम्ही योगदान देत आहात का? हेही स्पष्ट करावे”, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्याकडे महाराष्ट्रातील एका खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आला आहे. शिंदे गटाचे हे खासदार आहेत. ते सतत परदेशात जात असतात. ते परदेशात का जातात? हे आता हळूहळू बाहेर येत आहे. यांचा खर्च कोण करतं? हेही बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र बाहेर आल्यानंतर एकेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह स्वतःच जाहीर करतील की, आमचा यांच्याशी काही संबंध नाही. आमची चूक झाली.

“खासदार श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे बाळराजे आहेत. त्यांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात साजरा केला गेला. आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका व्यक्तीने भेट घेतल्याचे छायाचित्र मी प्रसिद्ध केले. त्या छायाचित्रातील महाशय कोण आहेत? हे पुणे पोलिसांनी जाहीर करावे. या महाशयांवर बाळराजेंनी आगामी निवडणुकीत काय जबाबदारी दिली आहे? हे समोर आणावे”, असाही आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेपूर्वी एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोतील व्यक्तीबाबत ही प्रतिक्रिया दिली.

“पीएमएलए कायद्याचा गैरवापर केला जात आहे. दोन पाच लाखांसाठी विरोधी पक्षातील लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात येतं. मी स्वतः या कायद्याचा बळी ठरलो. मला काही दिवस तुरुंगात धाडण्यात आलं. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई सुरू आहे. आपच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. भाजपाकडून पीएमएलए कायद्याचा गैरवापर होत आहे. गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा किंवा त्यातून निर्माण झालेला पैसा कुणी स्वीकारला असेल तर त्या मनी लाँड्रिग प्रकरणात संबंधित व्यक्तीला अटक झाली पाहीजे”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

“उल्हासनगर गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भाष्य केल्यानुसार त्यांचे कोट्यवधी रुपये मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पडून आहेत. हा आकडा १०० कोटींच्या वर असल्याचे सांगितलं जाते. मग याचा शोध ईडी घेणार का? गुन्हेगारी स्वरुपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे”, अशीही मागणी संजय राऊत यांनी केली.

या आरोपांना काही पुरावा आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले की, पीएमएलए कायद्यात एखाद्या व्यक्तीचे भाष्य हाच पुरावा मानला जातो. आमच्यावरही भाजपा नेत्यांच्या भाष्यावरच कारवाई करण्यात आली. मग भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःच याची कबुली दिली असेल तर तोच पुरावा मानला जावा. एरवी विरोधकांविरोधात तात्काळ करणारे ईडी, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आता कुठे आहेत? आर्थिक गुन्हे शाखा, सीबीआय, गृहमंत्रालय आता कुठे आहेत? ते फक्त विरोधकांसाठीच आहे का? एफआयआर झाल्याशिवाय ईडी कोणत्याही प्रकरणात पडत नाही. गणपत गायकवाड प्रकरणात एफआयआर झालेला आहे. त्याच एफआयआरचा वापर करून ईडी कारवाई करू शकते, असेही संजय राऊत म्हणाले.